स्पर्धापरीक्षा आणि नैराश्य

#स्पर्धापरीक्षा_आणि_नैराश्य

जगण्यापेक्षा स्वप्नांवर जास्त प्रेम होतं तेव्हा नैराश्य येतंच. 

महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची पूर्णवेळ तयारी करणाऱ्या काही हजार विद्यार्थ्यांना कधी न कधी पूर्ण नैराश्य येतंच पण ते येऊ नये किंवा नैराश्य आल्यावर काय करावं याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही म्हणून एकतर काहीजण खचून जातात, आयुष्यभर न्यूनगंड पाळतात, काहीजण व्यसनांच्या आहारी जातात तर काहीजण त्यातून सहीसलामत बाहेर पडून पुन्हा मेहनत करून यशस्वी होतात.

गेल्या साडेपाच वर्षातल्या मला एकदाच आलेल्या अनुभवाची ही गोष्ट आहे,

                       #माझ्या_नैराश्याची_कहाणी

2018 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा देऊन झाली होती, त्यावेळी जागा कमी होत्या, पण माझा तो चौथा अटेम्प्ट होता, आधीच्या तीन अटेम्प्ट आणि दोन मुलाखतीचा अनुभव माझ्याकडे होता. त्यामुळे साहजिकच या परिक्षेकडून माझ्या आणि माझ्यात अधिकारी शोधणाऱ्या मित्रपरिवार, कुटुंब आणि नातलगांना अपेक्षा जास्त होत्या. पण या सगळ्यांपेक्षा जास्त डेस्पिरेट होतो मी. या डेस्पिरेशन मुळे माझं अधिकारी व्हायचं स्वप्न हे माझी अंतिम गरज आहे अस माझ्या विवेकबुद्धी ला वाटत होतं.

मग परीक्षा झाली, मी ती चांगला अभ्यास करून दिली पण आधीच्या तीन अटेम्प्ट मध्ये जी सहजता होती ती यावेळी भीती मध्ये बदलली होती. भीती इतकी बसली होती की मी उत्तर तालिका (answer key) सुद्धा चेक करण्याची टाळत होतो. एरवी कोणत्याही परीक्षेची अन्सर की आल्यावर 5 मिनिटात तपासणारा मी त्यावेळी तब्बल 2 महिन्यांनी तपासली. आणि ज्याची भीती होती तेच झालं, स्कोर पोस्ट मिळण्याच्या बेंचमार्क पेक्षा कमी होता. 
त्यावेळी मुख्य परीक्षा ऑगस्ट महिन्यात झाली मी उत्तर तालिका नोव्हेंबरमध्ये दिवाळीला घरी जाण्याच्या आधी तपासली, दिवाळी मध्ये 5 दिवस कसेबसे खोटं हसू चेहऱ्यावर दाखवत काढले. आणि लगेच पुण्यात आलो. इथून माझ्या नैराश्याची खरी सुरवात झाली.

पुण्यात त्यावेळी माझ्या फ्लॅटवर मी आणि माझा मित्र असे दोघेच रहायचो आणि मित्र नेहमी जॉब मुळे महिना महिना गुजरात दौऱ्यावर असायचा. मग रिकामं घर आणि रिकामं डोकं यांचा अविचारी खेळ चालू व्हायचा. सलग 4 प्रयत्नात अपयश, 25-26 वर्ष वय होऊन घरच्यांवर अवलंबून, इतर मित्रांच्या हॉटेलिंग, गोवा, लडाख ट्रिप्स, कोणाचे लग्नाचे किस्से आणि ओळखीच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक्सायटिंग गोष्टी पाहून आपण नालायक आहोत आणि आपल्या जगण्याला फार किंमत नाही असेच विचार वारंवार मनात यायचे.

घरी फोन करणं तर मी जवळपास बंदच केलं होतं आणि मित्रांना फोन करायला कमीपणा वाटायचा, रूममधून 4-4 दिवस बाहेर निघायचो नाही, जेवण करू वाटायचं नाही, पाणी आणि पार्ले बिस्कीट हेच पूर्णान्न आहे असं वाटायचं. बाह्य जगाशी संवाद जवळपास संपला होता.आवाज करत घिरट्या घालणारा फॅन, स्वतः किती निक्कमे आहोत असे सतत विचार एवढंच मर्यादित विश्व होतं. 

MPSC is not a life, but there is no life without MPSC

असंच वाटायचं नेहमी. आणि मग जोडीला हे पुढचे विचार यायचे की
सिंहगड ची दरी जास्त खोल आहे की लोहगड ची, 12 फूट उंचीच छत 72 किलो वजन परपेंडीक्युलर दिशेने पेलवू शकेल काय, रेल्वे रुळावरून चालत जाताना रेल्वे पोलीस हटकतात का, किंवा सहज उपलब्ध होणारे कीटकनाशकात कोणती केमिकल कंटेंट असतात जी अपायकारक असतात असे विचार मनात यायचे.

साधारण 22-23 दिवस मी याच अवस्थेत होतो, या तीन आठवड्यात फार तर 5-6 वेळा जेवण केलं असेल ते पण ऑनलाईन मागवून. आणि 2-3 वेळा फ्लॅट बाहेर निघालो तेही मॅगी आणि पार्ले चा स्टॉक भरायला.

या 22-23 दिवसांपैकी शेवटी शेवटी तर निर्णय अजून पक्का होत जायचा फक्त अंमलबजावणी आज ऐवजी उद्या करू अस म्हणायच आणि दिवस काढायचा.

शेवटच्या दिवशी मस्त अंघोळ करून, दाढी करून, इस्त्रीचे कपडे घालून धूळखात पडलेली गाडी पुसून सदाशिव पेठ फिरत होतो, कदाचित शेवटची चक्कर म्हणून बऱ्याच मित्रांना पण भेटलो. गाडीवरून परत येत होतो, बऱ्याच दिवसांनी मिळालेली मोकळी हवा फुफुसात भरून घेत होतो, लाल सिग्नल लागला गाडी थांबवली. 

एक कॉल आला, त्यावर फार तर 20 सेकंद बोलणं झालं आणि निर्णयच बदलला, गाडी बाजूला घेतली, अर्धा तास राजाराम पुलावर बसून रडलो, अगदी जोरजोराने रडलो, आपल्या जिवंत असल्याने या जगात कोणाला तरी फरक पडतो हे कळलं, आपल्या अधिकारी असल्या किंवा नसल्याने घंटा फरक पडत नसला तरी आपल्या जिवंत नसल्याने फार फरक पडतो हे कळलं. सगळे निगेटिव्ह विचार गळून पडले.

पण मी या टोकाच्या निर्णयापर्यंत आलोच का याच गिल्ट मला होतं, मी तिथच माझ्या जवळच्या मित्रांना कॉल करून मागच्या महिन्याभरातल सगळं सांगितलं, आधी चार शिव्या दिल्या मला मग 15 मिनिटात माझ्या लोकेशन ला आले, त्यांच्या रूम वर घेवून गेले, 2 दिवस खूप आजारी पडलो होतो या सगळया नैराश्यामुळे, पण त्यांनी काळजी घेतली, कारण नसताना सुट्ट्या घेऊन माझ्या बाजूला बसून राहिले, माझं मन प्रसन्न व्हावं म्हणून त्यांनी उगाच पार्ट्या केल्या, बळजबरीने मला मूवी दाखव, मला शॉपिंग ला घेवून जा हे केलं, 15 दिवस डोळ्याच्या नजरेआड होऊ दिलं नाही. तेव्हा कुठं यातून बाहेर पडलो.

#समरी - 
1. ही फेज आयुष्यात कधी न कधी येत राहते, कोणावरही येऊ नयेच पण आली तरी योग्य व्यक्तीशी संवाद आणि सहवास ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. 
2. स्वप्न प्रिय असावीत पण ती प्राणप्रिय असू नयेत.
3. जिवाभावाची माणसं आजूबाजूला नेहमी असू द्या.
4. लढून मेलं तर किमान शहीद म्हणतील पण डाव सोडून जाणाऱ्याला पळपुटा म्हणतात म्हणून तात्कालिक सुटका होईल पण मरणोत्तर ही अपमानच होईल.
5. Everything happens for a good cause - जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं त्यामुळे पुढे चालत रहा, थांबू नका.
6. फॅमिली सोबत नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये रहा, आलेली प्रत्येक अडचण आणि झालेली प्रत्येक चूक शेअर केली तर ओझं बनत नाही.

आता शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचे,

'जिंदगी मे सबसे ज्यादा अगर कुछ इमपोर्टेन्ट है तो वो है खुद्द जिंदगी'

#मेसेज - स्पर्धा परीक्षेच्या बाहेर खूप मोठं जग आहे, त्यात ही बऱ्याच संधी आहेत, जे काम कराल त्यात सर्वोत्तम असाल तर mpsc मधून अपेक्षित असलेलं पैसा, प्रतिष्ठा आणि मानसन्मान या गोष्टी तिकडेही मिळतील. हट्ट यशस्वी बनण्याचा असावा पण त्याच क्षेत्रात व्हायच हा नसावा. 

#टीप - मला आलेलं नैराश्य हे अपेक्षांचं ओझं सहन न झाल्यामुळे आलेलं होत, माझ्या आर्थिक, सामाजिक आणि भावनिक बाजू तेव्हा उत्तम होत्या. आणि अपेक्षा मी स्वतः स्वतःकडून केलेल्या होत्या त्यामुळे त्याच ब्लेम इतर कोणावरही नाही. आणि या प्रसंगांतुन एकदा गेल्यामुळे आता पुन्हा काहीही झालं तरी ही चूक होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. 
बराच भाग मी लिहिल्या नंतर गाळला
 आहे त्यामुळे काही ठिकाणी प्रसंगाची लिंक तुटते पण लिहिले असते तर जास्त प्रश्न निर्माण झाले असते म्हणून सांभाळून घ्या.

- एक ध्येयवेडा .

Comments